Advance Salary : वित्त विभागाच्या अधिनस्त संचालनालय लेखा व कोषागारे याचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या ट्रेझरीनेट, बीम्स, बील पोर्टल, सेवार्थ, ग्रास,निवृत्तिवेतनवाहिनी, कोषवाहिनी, अर्थवाहिनी, महाकोष, वेतनिका,IPLA,VPDAS, इत्यादी संगणक प्रणालींच्या संदर्भात मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचे मार्फत करण्यात येत असलेले Data Managed Hosting चे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही (Migration) सद्यस्थितीत सुरु आहे. हस्तांतरणाची (Migration ची) प्रक्रिया तांत्रिक स्वरुपाची असल्यामुळे अतिशय गुंतागुंतीची आहे. या प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून, माहे ऑक्टोबर, २०२४ च्या शेवटच्या सप्ताहामध्ये उपरोल्लेखित सर्व प्रणाली बंद ठेवणे (Down Time घेणे) अनिवार्य आहे.
Advance Dilwali Salary for Employees
उपरोल्लेखित सर्व संगणक प्रणालींच्या Data Managed Hosting चे कामकाज मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचेकडून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याच्या कार्यवाही दरम्यान सर्व संगणक प्रणाली बंद रहाणार असल्यामुळे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या प्रदानास विलंब होऊ नये म्हणून मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम ३२८ व नियम ३२९ मधील तरतुदी शिथील करुन, माहे ऑक्टोबर, २०२४ चे वेतन आणि निवृत्तिवेतन नियत देय दिनांकापूर्वी अदा करण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
१. संचालनालय, लेखा व कोषागारे यांचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या सर्व सगणक प्रणालींच्या संदर्भात मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचेकडील Data Managed Hosting चे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ,मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दि.३१ ऑक्टोबर २०२४ रोजी देय ठरणारे माहे ऑक्टोबर, २०२४ चे वेतन आणि निवृत्तिवेतन दि.२५ ऑक्टोबर,२०२४ पूर्वी अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२.मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी आणि महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम ३२८ आणि नियम ३२९ मधील तरतुदी शिथील करण्यात येत आहेत.
३.माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके आणि निवृत्तिवेतन देयके त्वरीत यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई; संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय, उप कोषागार कार्यालय येथे सादर करावीत.
४. सदर निर्णय जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषि विद्यापीठे, अकृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालये यांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृत्तिवेतनधारक यांना देखील लागू होईल.
५. माहे ऑक्टोबर, २०२४ च्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान दि.२५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी होण्यासाठी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित करण्यात येणार आहेत.